अॅपल कंपनीचा अधिकृत घाऊक विक्रेता असल्याचे भासवून साडेपाच कोटींची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अॅपल कंपनीचा इन्ग्राम कोड असल्याचे भासवून अॅपल कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी देण्याच्या नावाखाली ऑर्डर व पैसे घेऊन माल न देता एका वितरकाला तब्बल ५ कोटी ५२ लाख ८२ हजार ५६२ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निखिल अरुण सर्गे (वय ४२, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सर्फ कम्युनिकेशनचे संचालक रफी सईत, शाबीर सईत आणि टी व्ही कॉर्प सोल्युशन्सचे संचालक विश्वनाथ मुरुगप्पन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर येथील व्हेरॉनिक्स ग्लोबल या कंपनीत एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅपल या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी इन्ग्राम कोड असणे आवश्यक असते. त्याशिवाय कंपनीच्या मालाचा पुरवठा करता येत नाही. फिर्यादी निखिल सर्गे हे वितरक असून त्यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे.
सर्फ कम्युनिकेशन ही कंपनी मोबाईल व त्यासंबंधित उपकरणांची विक्री करते. तिचे संचालक रफी सईत व शाबीर सईत आणि टी व्ही कॉर्प प्रा. लि. या कंपनीचे संचालक विश्वनाथ मुरुगप्पन यांनी आम्ही अॅपल कंपनीचे अधिकृत वितरक असून आमच्याकडे माल पुरवठ्यासाठी इन्ग्राम कोड आहे, असे भासवले.
फिर्यादींकडून त्यांनी पर्चेस ऑर्डर घेतली. सुरुवातीला त्यांनी इतरांकडून माल घेऊन अॅपल कंपनीचे मोबाईल व इतर उपकरणांचा पुरवठा केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादींकडून काही कोटी रुपये घेतले, त्यापैकी काही माल पुरविला; मात्र साडेपाच कोटी रुपयांचा माल पुरवला नाही. चौकशी केल्यावर संबंधित कंपनीकडे इन्ग्राम कोड नसल्याची माहिती फिर्यादींना मिळाली.
फिर्यादींनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी पैसे देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यांनी लेटरहेडवर साधा समजुतीचा करारनामा तयार करून त्यावर फिर्यादींकडून जबरदस्तीने सही करून घेतली. तसेच कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पोस्टडेटेड धनादेश दिले.
वेळोवेळी विविध कारणे देत त्या धनादेशांचे वटविणे टाळले आणि फिर्यादींकडून घेतलेल्या साडेपाच कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे करत आहेत.


















