१७ तासांच्या आत २२६ किमी अंतर पूर्ण; जिद्द, सातत्य आणि प्रेरणेचा अनोखा प्रवास
पुणे : जिद्द, चिकाटी आणि ध्येयपूर्तीची ज्वलंत उदाहरण ठरलेल्या ताम्हाणे पिता–पुत्रांनी न्यूझीलंडमधील तावपो येथे आयोजित आर्यनमॅन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १७ तासांच्या निर्धारित वेळेत २२६ किमी अंतर पूर्ण केले. अपर पोलीस अधीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे (वय ५८) आणि त्यांचा मुलगा गौरांग विष्णु ताम्हाणे (वय १९) यांनी एकत्रितपणे ही खडतर स्पर्धा पूर्ण करून पोलीस दलातील पहिली पिता–पुत्र जोडी म्हणून इतिहास रचला आहे.
दि. ७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील १००८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे असे एकूण २२६ किमी अंतर १७ तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. ‘Everything is possible’ हे या स्पर्धेचे ब्रीदवाक्य असून ताम्हाणे पिता–पुत्रांनी ते प्रत्यक्षात उतरवून दाखवले.
या यशामागे ताम्हाणे यांचा दीर्घकालीन फिटनेस प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. वडील कै. नाथा गोविंद ताम्हाणे यांच्या आजारपणात त्यांना मदत करताना स्वतः शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याची जाणीव झाल्याने विष्णु ताम्हाणे यांनी फिटनेसचा संकल्प केला. त्यानंतर नियमित चालणे, धावणे आणि मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत त्यांनी स्वतःला घडवले. आतापर्यंत त्यांनी ५० हून अधिक हाफ मॅरेथॉन आणि २० फुल मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत.
गौरांग ताम्हाणे याचाही प्रवास तितकाच खडतर राहिला. सरावादरम्यान त्याला अनेक अपघातांचा सामना करावा लागला. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अपघातात त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊन ३५ टाके घालावे लागले. तसेच सायकलिंग सरावादरम्यानही अनेकदा दुखापती झाल्या. तरीही त्याने जिद्द न सोडता पुन्हा सराव सुरू ठेवत वडिलांसोबत स्पर्धा पूर्ण करण्याचे ध्येय गाठले.
न्यूझीलंडमधील थंड हवामान, १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान, तसेच सायकलिंग व धावण्यातील चढ-उतार यामुळे स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली. सुरुवातीला थंड पाण्यात पोहणे कठीण गेले, मात्र दोघांनीही मानसिक व शारीरिक क्षमतेच्या जोरावर ही अडचण पार केली.
स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गौरांगने वडिलांपेक्षा ४ मिनिटे आधी (१६ तास ३० मिनिटे) स्पर्धा पूर्ण केली, तर विष्णु ताम्हाणे यांनी १६ तास ३४ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. “जब तुम मुझे हराओगे, तब मैं जीत जाऊंगा” या भावनेला साजेसा हा क्षण ठरला.
या स्पर्धेत पुण्यातील अनुभवी स्पर्धक दशरथ जाधव यांनीही सहभाग घेत १७ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण केली. तसेच वृषाली ढोणे, सत्यजित जोशी आणि मनदीप भाटिया यांनी ७०.३ आर्यनमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
ताम्हाणे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. आई सिताबाई, पत्नी सुनिता, कन्या पुनम व तेजस्वी यांनी त्यांना सातत्याने साथ दिली. तसेच प्रशिक्षक, सहकारी आणि मित्रपरिवार यांनीही मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
पोलीस दलात कार्यरत असताना वेळेचे नियोजन करत त्यांनी सरावात सातत्य ठेवले. “इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो” हे ताम्हाणे पिता–पुत्रांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
ताम्हाणे पिता–पुत्रांची ही कामगिरी केवळ पोलीस दलासाठीच नव्हे, तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून “Age is just a number” आणि “Never give up” या विचारांची प्रचिती देणारी ठरली आहे.















