अंमली पदार्थ विरोधी पथकाचा विमाननगरमध्ये छापा, दीड लाखांची विदेशी दारू, हुक्का साहित्य केले जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवून विना परवाना विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये स्वप्निल शांताराम तांबे (वय ३२, रा. स्वस्तिक कॉलनी, केसनंद फाटा, वाघोली), अमेय मुकेश अजमिरे (वय २८, रा. पाम अटलांटिस, बावडी रोड, वाघोली), नवरंग विठ्ठलराव कोल्हे (वय २८, रा. अटलांटिस रूफ टॉप लाऊंज, रॉयल टॉवर, विमाननगर), अमितकुमार दयालजी गोयल (वय २६, रा. फॉरेस्ट एज, खराडी), कमरुल इस्लाम लष्कर (वय २६, रा. साईनाथ नगर, खराडी), शिवमकुमार श्रीरामराज यादव (वय २३) आणि माहरुफ अफताफउद्दीन आलम (वय १८, रा. साईनाथ नगर, खराडी) यांचा समावेश आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक ५ एप्रिल रोजी गस्त घालत असताना विमाननगर येथील ‘अटलांटिस रूफ टॉप लाऊंज’ येथे बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये हुक्का बार सुरू असल्याचे तसेच विना परवाना विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट, विदेशी दारूच्या बाटल्या, साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
पोलीस बनले महाविद्यालयीन विद्यार्थी
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कारवायांची खात्री करण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सोंग घेतले. तेथे नियमित येणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला. सुरक्षेसाठी चौकशी करूनच आत सोडले जात असल्याचे उघड झाले. इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत लिफ्टने जाऊन पुढे टेरेसवर शेड टाकण्यात आली होती. त्या ठिकाणी हुक्का आणि विदेशी दारूचा आस्वाद घेणारे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून कारवाई केली.

















