क्लार्कने बनावट रेकॉर्ड तयार करून इंटरनेट बँकिंगद्वारे पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले पैसे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल या संस्थेतील क्लार्कने इंटरनेट बँकिंगद्वारे संस्थेच्या संमतीशिवाय पत्नीच्या नावावर परस्पर रक्कम ट्रान्सफर करून ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रगण सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राजेंद्र अनपट आणि अश्विनी अनपट ऊर्फ अश्विनी तरटे (रा. युतिका एन्क्लेव्ह, कोल्हेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नांदेड सिटीमधील पवार पब्लिक स्कूल येथे ५ नोव्हेंबर २०२४ ते ३ जून २०२५ दरम्यान घडला.
या संस्थेत राजेंद्र अनपट हे क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संस्थेच्या संमतीशिवाय इंटरनेट बँकिंगद्वारे परस्पर रक्कम पत्नी अश्विनी अनपट हिच्या नावावर ट्रान्सफर केली. तसेच संस्थेच्या अभिलेखात खोटे रेकॉर्ड तयार करून संस्थेचा विश्वासघात केला.
यामध्ये ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. संस्थेच्या लेखापरीक्षणात ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली.
नामवंत संस्था
विद्या प्रतिष्ठान ही एक नावाजलेली संस्था आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या व्यवस्थापन समितीमार्फत विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूलचे संचालन केले जाते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक वासुदेव प्रभुणे, खजिनदार युगेंद्र श्रीनिवास पवार आहेत. अॅड. नीलिमा विनोदकुमार गुजर या सचिव आहेत. खासदार सुप्रिया सदानंद सुळे या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विठ्ठल बी. मणियार, प्रतापराव गोविंदराव पवार हे विश्वस्त आहेत.















