आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांवर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात

Spread the love

भूम : दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे सांस्कृतिक, IQAC व NSS विभागांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सन २०२६ हे वर्ष महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांनी साजरे केले जात असून, त्याच पार्श्वभूमीवर मानवी हक्कांचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजजीवनातील स्थान अधोरेखित करणारे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. गौतम तिजारे उपस्थित होते. त्यांनी महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करताना सामाजिक समता, मानवी हक्क आणि संविधानिक मूल्ये यांचा सखोल उहापोह केला. विद्यार्थ्यांनी समाजपरिवर्तनासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तानाजी बोराडे होते. यावेळी IQAC समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे, डॉ. नितीन पडवळ, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राजश्री तावरे, डॉ. शीतल अलगुंडे, प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे, प्रा. गजानन कऱ्हाळे तसेच प्रा. राहुल राठोड, प्रा. जयेश मसराम आणि प्रा. पूनम सुतार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल अलगुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षयकुमार डोंगरदिवे यांनी केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि मानवी हक्कांविषयीची जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.