वाघोली पोलिसांची कामगिरी : ऑडी कारसह ३१ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाघोली पोलीस ठाण्याचे तपास पथक सातव वस्ती रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे व विशाल गायकवाड यांना पाहून एक जण घाईगडबडीत कार घेऊन जाऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली.
त्यावेळी गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या योगेश कणगरे याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ८ हजार रुपयांची ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) पावडर आढळून आली. पोलिसांनी कारसह एमडी जप्त करून योगेश कणगरे याला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ही एमडी पावडर त्याचा मित्र सोनू सिंह याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोनू सिंह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४७ हजार रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, अॅक्टिव्हा दुचाकी आणि मोबाईल मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली.
त्यात घराच्या पार्किंगमध्ये ऑडी कंपनीची कार आढळली. या कारची झडती घेतली असता कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांची २३ ग्रॅम एमडी पावडर मिळाली. ड्रग्जसह पोलिसांनी २० लाखांची ऑडी कार जप्त केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३७ ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल, दोन कार व एक दुचाकी असा ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, राहुल कोळपे तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे व अमोल ढोणे यांनी केली आहे.

















