बार्शीच्या ओन्ली समाजसेवा संस्थेचा उपक्रम : उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दिवसभर सेवा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने मोफत 400 जीआर पाण्याचे वाटप करण्यात आले. बुधवार, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मोठ्या प्रमाणात भाविकांना पाणी वाटप करण्यात आले.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता, गेल्या तीन वर्षांपासून यात्रेनिमित्त सोनारी येथे येणाऱ्या भाविकांसाठी संस्थेकडून हा उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमासाठी बार्शीतील दानशूर व्यक्ती, मित्रपरिवार तसेच संस्थेचे सभासद यांच्याकडून नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर संस्थेच्या खात्यावर आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय काही मित्रपरिवाराकडून पाण्याचे संकलनही केले जाते.
या सर्वांच्या सहकार्यामुळेच भाविकांची तहान भागविण्याचे कार्य शक्य होत आहे. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले की, संस्थेचे पारदर्शक कार्य पाहून अनेकांकडून मदतीचा हात पुढे येत असून, या सहकार्यामुळेच पाणी वाटपासह विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविणे शक्य होत आहे.
या कार्याचे सर्व श्रेय सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाच जाते, असेही त्यांनी नमूद केले. सोनारी येथील पाणी वाटपाच्या नियोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ, पंचकमिटी तसेच एम.एस.सी.बी.चे कर्मचारी व अधिकारी आदरणीय गाढवे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
भाविकांनी पाणी ग्रहण केल्यानंतर संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत आशीर्वाद दिले. तसेच संस्थेचे कार्य अखंड सुरू राहावे, अशी प्रार्थना श्री काळभैरवनाथ यांच्या चरणी करून ‘काळभैरवनाथाचे चांगभलं’ असा जयघोष केला.
या पाणी वाटप कार्यक्रमात अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते तसेच रवि वाणी, भरत जाधव, सुनिल नवले, विजय (मामा) येवारे, अतुल वाणी, अण्णा जाधव, सागर घंटे, सुरज हाजगुडे, संदीप वाणी, धीरज परदेशी, पिंटू मस्के, श्रीमंत चव्हाण, भारत झेंडे, आकाश सोनटक्के, संदीप तवले, रेखा विधाते, रागिनी झेंडे, कोमल वाणी, अनुसया आगलावे, सुनिता गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल स्थानिक पंचकमिटीने संस्थेचे आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी आभार व्यक्त केले.
















