परवानगीशिवाय उभारलेले महाकाय होर्डिंग जमीनदोस्त : प्रशासनाचा इशारा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करत ते हटवले असून, अशा बेकायदेशीर होर्डिंगविरोधात पुढेही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे शुक्रवारी (दि. १७) कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय उभारलेले महाकाय होर्डिंग प्रशासनाने जमीनदोस्त केले.
लोणीकंद येथील गट क्रमांक ४१ मध्ये हे होर्डिंग उभारण्यात आले होते. यावर ‘पीएमआरडीए’ने तत्काळ कारवाई करत ते हटवले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रवींद्र रांजणे आणि तहसीलदार आशा होळकर यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली.
“पीएमआरडीए हद्दीत वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होर्डिंगला कायदेशीर परवानगी असणे आवश्यक आहे. ज्या होर्डिंगधारकांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही, त्यांनी ती तातडीने घ्यावी. अन्यथा, यापुढे अशा सर्व अनधिकृत होर्डिंगवर अधिक कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा हिंमत खराडे यांनी दिला.
पुणे महानगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, ‘पीएमआरडीए’च्या या आक्रमक भूमिकेमुळे बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
















