आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टा मारून खुनाचा प्रयत्न

Spread the love

पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

क्रिश सुरेंद्रसिंग (वय २०, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेथील ज्युस विक्रेता विशाल चंद्रकांत घोरपडे (वय ३६, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी लवेश महेंद्र सोत्ता (वय १९) आणि समद ऊर्फ चिक्क्या परवेज शेख (वय १८, दोघे रा. उत्तमनगर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उत्तमनगरमधील देशमुखवाडी येथील लक्ष्मी निवास बिल्डिंगसमोरील ज्युस गाडीसमोर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल घोरपडे यांचा ज्युसचा गाडा आहे. त्यांच्या गाड्याशेजारी कानसकर यांचे फुलांच्या हारांचे दुकान आहे. कानसकर व त्यांच्यासोबत क्रिश हे ज्युस पिण्यासाठी आले होते. कानसकर ज्युस ओतून घेत असतानाच दुचाकीवरून चौघेजण आले. त्यांनी क्रिशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

चार मुलांपैकी लवेश सोत्ता याचे वडील महेंद्र सोत्ता यांचा ज्युस गाड्याशेजारीच ‘भोलेनाथ’ नावाने आईस्क्रीमचा गाडा आहे. लवेश याने शिवीगाळ करून “याला खल्लास करून टाकायचे,” असे म्हणत बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टा उचलून क्रिशच्या डोक्यात मारला.

सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुसऱ्या मुलाने तेथील दुसरा सिमेंटचा ब्लॉक उचलून डोक्याजवळ, कानावर मारला. क्रिशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्त येत होते. लोक धावत आल्यानंतर ही मुले पळून गेली.

लोकांनी क्रिशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. क्रिश याने गेल्या महिन्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींना मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी क्रिशला मारहाण केली. क्रिश अजून बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना त्याचा जबाब घेता आलेला नाही. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.