१.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त : अश्लील नृत्य प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे एकाच रात्रीत तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई करून मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत एकूण ९१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल १,२१,८३,२३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परवानाधारक ऑर्केस्ट्रा बार निर्धारित वेळेनंतर सुरू ठेवणे, महिलांकडून अश्लील हावभाव व नृत्य करून घेणे तसेच ग्राहकांकडून पैशांची उधळण केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित कायद्यांतर्गत विशेष पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली.
कोंडी येथील कसिनो ऑर्केस्ट्रा बारवर सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार गणेश पाटील, श्रीदेवी परचंडे व आरसीपी पथकाने छापा टाकला. येथे ११ महिला व २३ ग्राहक आढळून आले असून सुमारे ४६.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खेड येथील सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दशरथ गोरे व आरसीपी पथकाने कारवाई केली. येथे ७ महिला व १८ ग्राहक आढळून आले असून सुमारे १८.०० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बळेवाडी येथील सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बारवर सहायक पोलीस निरीक्षक देवीदास कारंडे व आरसीपी पथकाने छापा टाकून १८ महिला व ९ ग्राहकांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून सुमारे ५७.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये साउंड सिस्टीम, मोबाईल, वाहने तसेच एक तलवार यांचा समावेश आहे.
या तिन्ही कारवाईंमध्ये बार मालक व व्यवस्थापक यांच्या संगनमताने महिलांकडून अश्लील नृत्य करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास कारंडे तसेच पोलीस अंमलदार दशरथ गोरे, गणेश पाटील, श्रीदेवी परचंडे आणि दंगा पथकातील पुरुष व महिला अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

















