भाजपच्या विधी शाखेच्या अध्यक्षासह पत्नीला अटक : पोत्यात मृतदेह भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वकिलाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने त्याच्या सेक्रेटरीचे पाय बांधून तिच्यावर बॅटने व धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पूनम दिनेश मुन (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वाती संजय सावंत (वय ४३) आणि अॅड. संजय दत्तात्रय सावंत (वय ४३, दोघे रा. आनंद पार्क, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दिनेश उद्धवराव मुन (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अॅड. संजय सावंत हे भाजपच्या विधी शाखेचे अध्यक्ष आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सावंत हे वकील असून त्यांचे चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील संदीप हॉटेलजवळ एका गाळ्यात कार्यालय आहे. पूनम मुन ही गेली ३ वर्षे त्यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. तिचे आणि अॅड. संजय सावंत यांचे प्रेमसंबंध असल्याचा त्यांच्या पत्नी व मुलीला संशय होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे झाली होती.
पूनम मुन ही १६ एप्रिल रोजी दुपारी कार्यालयात गेली. ती रात्री परत न आल्याने तिचे पती दिनेश मुन हे तिला शोधण्यासाठी १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात गेले. तेथे पूनम हिचा मृतदेह एका पोत्यात अर्धवट भरलेला दिसून आला. कार्यालयात रक्त पडलेलेही आढळले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले.
पोलिसांच्या तपासात पूनम हिचा खून स्वाती सावंत व त्यांच्या अल्पवयीन मुलीने कट रचून केल्याचे निष्पन्न झाले. अॅड. संजय सावंत यांचे पूनम हिच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचा स्वाती सावंत यांना संशय होता. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.
१६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पूनम मुन कार्यालयात असताना स्वाती सावंत व त्यांची मुलगी तेथे आल्या. त्यांनी पूनम हिचे पाय दोरीने बांधले आणि तिच्या डोक्यावर व तोंडावर बॅटने मारहाण केली. तसेच तिच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती अॅड. संजय सावंत यांना झाली होती, तरीही त्यांनी पोलिसांना काहीही कळविले नाही. ते तसेच मुंबईला निघून गेले. दरम्यान, स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी हेही फरार झाले होते.
चंदननगर पोलिसांनी तांत्रिक तपास करून अॅड. संजय सावंत व त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. खंडणीविरोधी पथकाने स्वाती सावंत यांनाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर ६ तासांच्या आत आरोपींना जेरबंद करण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, नूतन पवार, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख तसेच पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि त्यांच्या पथकाने केली.

















