लँडिंग गिअर खराब : धावपट्टीचे नुकसान, ८६ विमाने, १० तासांनंतर विमानतळ हळुहळु सुरु
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला. या विमानाचे लँडिंग गियर निकामी झाले. त्यामुळे या विमानाने ईमर्जन्सी लँडिंग करताना ते धावपट्टीवर घासत गेले. यामुळे धावपट्टीचे मोठे नुकसान झाल. तसेच हे विमान धावपट्टीवरच अडकून पडल्याने सर्व विमान सेवा ठप्प झाली. जवळपास १० तासांच्या प्रयत्नानंतर हे विमान बाजूला करण्यास व धावपट्टीची दुरुस्ती करण्यास प्रशासनाला यश आले आहे.
शनिवारी सकाळी ९ वाजल्यानंतर विमानांचे उड्डाण व आगमन हळूहळू सुरू झाले आहे. या काळात ८६ विमाने रद्द करण्यात आली, तर काही विमाने इतर विमानतळांकडे वळविण्यात आली आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाचे एक लढाऊ विमान उतरत असताना त्याचे लँडिंग गिअर निकामी झाले. त्यामुळे हे विमान धावपट्टीवर घासत गेल्याने धावपट्टी खराब झाली. तसेच हे विमान धावपट्टीवर अडकून बसले होते.
विमानतळ प्रशासनाने क्रेन मागवून हे विमान आधी बाजूला घेतले. त्यानंतर धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. जवळपास ९ तासांच्या प्रयत्नानंतर धावपट्टी विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास विमानांचे उड्डाण आणि आगमन सुरू झाले आहे. काही तासांत विमानतळावरील वाहतूक पूर्ववत होईल, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या अपघातामुळे मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास पुण्याहून इतरत्र जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना रात्री उशिरा घडलेल्या या अपघाताची कल्पना नव्हती. पहाटे व सकाळच्या विमानांसाठी दोन तास आधी पोहोचण्यासाठी ते घरातून लवकर निघाले होते. मात्र विमानतळावर आल्यानंतर त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. मध्यरात्रीनंतरच्या विमानांसाठी काही हजार प्रवासी विमानतळावर पोहोचले होते. या काळात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

















