माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गौरव : मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दि बार्शी मर्चंट्स असोसिएशन लि., बार्शी यांच्या नूतन संचालकांच्या निवडी निमित्त आयोजित सत्कार सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथील सौदे हॉल, बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष दीपक वैद्य तसेच बाजार समितीचे चेअरमन विजय गरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी, गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत असोसिएशनच्या आगामी कार्यकाळासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती.
व्यापाऱ्यांमध्ये एकोपा राखून संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला होता. त्या बैठकीत झालेल्या निवडीच्या पार्श्वभूमीवर आजचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
व्यासपीठावर मावळते अध्यक्ष बाबासाहेब कथले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबा गायकवाड, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषशेठ लोढा, कृषी उत्पन्न बाजार संचालक रामेश्वर पाटील, अजित दादा बारंगुळे, पप्पू हनुमंते, गजेंद्र मुकटे, प्रवीण गायकवाड, भरतेश गांधी व्यापारी मल्लिनाथ गाढवे, मैंनुदिन तांबोळी, महेश बाफना, सीए अतुल गुंडेवार व दामुआण्णा काळदाते यांची मान्यवरांमध्ये उपस्थिती होती.
नूतन अध्यक्ष दिलीप शांतिलाल गांधी, उपाध्यक्ष सुभाष साखरे, सचिव महेश रमेश करळे, सहसचिव अरुण अंकुशराव मुंढे, खजिनदार संतोष बोराडे तसेच वांदे कमिटी चेअरमन नवनाथ गपाट यांच्यासह संचालक मंडळातील देवकीनंदन खटोड, सिराज तांबोळी, दीपक अनंता शिंदे, धनंजय अंबऋषी राऊत, अजय हागरे, ज्ञानेश्वर मारकड, अजय काळदाते, गोविंद बाफना व संतोष लोंढे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत व्यापारी संघटनेच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद तसेच बाजार समितीतील विविध घटक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र राऊत, मावळते अध्यक्ष बाबासाहेब कथले तसेच नूतन अध्यक्ष दिलीप गांधी यांनी मनोगत व्यक्त केले.
दि बार्शी मर्चंट्स असोसिएशनची स्थापना सन १९४१ मध्ये झालेली असून ही बाजारपेठ समृद्ध परंपरेची आहे. माझा अध्यक्षपदाचा १७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीतही १७ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात संपर्क कसा साधावा आणि तो कसा टिकवावा, हे मी या मार्केटमध्ये शिकलो. आज बाजारातील चौथी पिढी पाहण्याचा अनुभव मला मिळत आहे. नूतन अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. माझ्या कार्यकाळात व्यापारी, वारणी कामगार, माथाडी कामगार, तोलार, चाळणी कामगार, मुनीम तसेच बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांचा मला मोठा हातभार लाभला. – मावळते अध्यक्ष बाबासाहेब कथले
श्री भगवंत महोत्सवासाठी देणगी – नूतन अध्यक्षपद मिळाल्याच्या आनंदापोटी ‘दर्शना सॉल्व्हेंट’च्या वतीने श्री भगवंत महोत्सवासाठी दर्शना सॉल्व्हेंटचे मालक तसेच दि. मर्चंट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष दिलीप गांधी, शीतल गांधी तसेच त्यांची नात अमोली गांधी यांच्या कडून भरीव आर्थिक योगदान देण्यात आले. ही देणगी भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषशेठ लोढा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

















