२ हजार गुंतवणूकदारांच्या ४३ कोटींच्या ठेवी बेकायदेशीरपणे स्वीकारल्या : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीत पार्टनर करून घेतो, असे कागदोपत्री दाखवून दरमहा १ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जात होत्या. कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्याच्या कारणावरून वेलेंटिना इंडस्ट्रीजच्या संचालकांवर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
संतोष नाथा बांदल (रा. गिडणी पार्क, सॅलिसबरी पार्क) आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या अनियमित ठेव योजनेसंबंधी गोपनीय पडताळणी करण्याचा आदेश जुलै २०२५ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिला होता. पोलिसांनी गुंतवणूक करायची आहे, असे भासवून कर्वे रोडवरील कार्यालयात जाऊन सुरुवातीला गोपनीयरीत्या माहिती घेतली.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडील माहितीनुसार, ज्ञानेश्वर चोरगे, संतोष बांदल, जयश्री संतोष बांदल, सुमषा ज्ञानेश्वर चोरगे हे संचालक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवले आहेत. २०२२ पासून कंपनीतील गुंतवणूकदारांच्या यादीत एकूण २,१३६ गुंतवणूकदारांनी ४३ कोटी १९ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक केली असल्याची यादी त्यांनी पोलिसांना दिली.
कागदोपत्री ११ हजार गुंतवणूकदार असल्याचे दाखवण्यात आले आहे. कंपनीच्या जमाखर्च पत्रकावरून कंपनीला तोटा होत असल्याचे दिसून येते. परंतु, लोकांकडून पैसे मिळवण्यासाठी कंपनीची उलाढाल कागदोपत्री ३०० कोटी आणि ऑफ द रेकॉर्ड ३ हजार कोटी असल्याचे सांगून जादा परताव्याचे आमिष दाखवले जात होते.
यावरून कंपनीने कोणत्याही शासकीय संस्थेकडून पूर्वपरवानगी न घेता अंदाजे ४३ कोटी १९ लाख ९० हजार रुपये बेकायदेशीर ठेवीच्या स्वरूपात स्वीकारले असल्याचे दिसून येते. बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचा पुढाकार – या कंपनीची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यात कंपनी ठेवी स्वीकारत असतानाही त्यांना ‘भागीदार’ असे संबोधत होती. कोणत्याही शासकीय संस्थेची पूर्वपरवानगी न घेता ठेवी स्वीकारल्या जात होत्या. आमच्याकडे कोणी तक्रारदार आलेला नाही. मात्र, भविष्यात गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. — विवेक मासाळ, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा
कंपनीची योजना – या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास संबंधितांना गुंतवणूकदार न समजता कंपनीमध्ये भागीदार म्हणून घेतले जात होते. या भागीदारी पत्रामध्ये कागदोपत्री दरमहा १ टक्के परतावा नमूद असे; परंतु प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे सांगितले जात होते. या कंपनीअंतर्गत आतापर्यंत १० कंपन्या असून आणखी ११ कंपन्या सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते.
गुंतवणूकदारांना संपर्क साधण्याचे आवाहन – कंपनीकडून परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली असल्यास संबंधित कागदपत्रे व पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.


















