व्यापाऱ्याला व्याजाने पैसे देताना केली फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी व्यापाऱ्याने व्याजाने पैसे घेताना तारण म्हणून दोन गाळ्यांचे कुलमुखत्यार पत्र लिहून घेतले. व्यापाऱ्याची अगोदर सही व फोटो घेतला. त्यानंतर कागद चुकला असल्याचे सांगून दुसऱ्यांदा फोटो व सही घेतली. प्रत्यक्षात कुलमुखत्यार पत्राबरोबर फसवून खरेदीखत केल्याचे उघड झाले. ३ कोटींची मालमत्ता ७५ लाखांमध्ये खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हसमुख पारसमल जैन (वय ४२, रा. गगन उन्नती सोसायटी, कात्रज-कोंढवा रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शेखर बापुसाहेब चिंधे (रा. जांभुळवाडी, ता. हवेली) आणि अमित देवराम कलाटे (रा. वाकड, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २२ मार्च २०२३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसमुख जैन यांचे कुदळे पाटील प्रेस्टीज बिल्डिंग येथील गाळा क्रमांक ६ व ७ अशी दोन दुकाने आहेत. त्यांनी त्यापैकी गाळा क्रमांक ६ भाड्याने दिला होता. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पारंपरिक ज्वेलरी व्यवसाय सुरू केला. त्यासाठी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतून गाळा क्रमांक ६ वर ५० लाखांचे कर्ज घेतले होते आणि त्याचे हप्ते नियमित भरत होते.
मार्च २०२३ मध्ये त्यांना तातडीने माल खरेदीसाठी २५ लाखांची गरज होती. अॅड. संभाजी थोरवे यांच्या ओळखीने शेखर चिंधे यांच्याकडून १० टक्के व्याजाने पैसे घेतले. त्यासाठी आंबेगाव येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन शेखर चिंधे यांच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी केली.
त्यानंतर ते दरमहा अडीच लाख रुपये प्रमाणे ६ महिने व्याजापोटी ओंकार चिंधे, संभाजी थोरवे व राजेश थोरवे यांना देत होते. यानंतर शेखर चिंधे यांनी दिलेले पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यावेळी थोरवे यांनी अमित कलाटे यांची ओळख करून दिली. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी ३५ लाख रुपये व्याजाने देण्यास तयारी दर्शवली. त्यासाठी गाळ्याची पॉवर ऑफ अॅटर्नी करावी लागेल, असे सांगितले.
८ नोव्हेंबर २०२३ रोजी हवेली सब-रजिस्ट्रार कार्यालयात फिर्यादींना बोलावण्यात आले. तेथे सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवली होती. फिर्यादी ज्या ठिकाणी सही करण्यास सांगितले, तेथे त्यांनी सही केली, कारण त्यांना पॉवर ऑफ अॅटर्नीच करायची होती.
त्यावेळी संभाजी थोरवे यांनी कागद चुकला असल्याचे सांगून पुन्हा फोटो व सही घेतली. त्यानंतर त्यांनी कागद तपासून सही केली. काही महिन्यांनी अमित कलाटे व सुरज लोखंडे यांनी मुद्दलाची रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे फिर्यादींनी गाळे विकून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. जून २०२५ मध्ये त्यांनी एजंटमार्फत गाळा विक्रीसाठी कागदपत्रे दिली. एजंटने सर्च रिपोर्ट काढला.
सर्च रिपोर्टनुसार, ८ नोव्हेंबर २०२३ रोजीच दोन्ही गाळे खरेदीखताद्वारे अमित कलाटे यांच्या नावावर झाले असल्याचे दिसून आले. १९ जून २०२५ रोजी अमित कलाटे यांनी मयुरेश विक्रम वैशंपायन यांना हे गाळे २ कोटी ९० लाख रुपयांना विकल्याचेही उघड झाले. प्रत्यक्षात बाजारभाव ३ कोटी असताना कागदोपत्री केवळ ७५ लाख रुपये दाखवण्यात आले होते.
अमित कलाटे यांनी व्याजापोटी ३५ लाख रुपये देणे अपेक्षित होते; मात्र ते खरेदीखतामध्ये दिल्याचे दाखवण्यात आले. तसेच गाळ्यातील लॉकरमधील २० तोळे सोने व २ लाख रुपयेही आढळले नाहीत. यावरून शेखर चिंधे व अमित कलाटे यांनी फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.
सर्च रिपोर्टवरून प्रकार उघड
सर्च रिपोर्ट काढल्यानंतरच हा प्रकार उघडकीस आला. कागदपत्रांची पडताळणी करताना आधी खरेदीखत करण्यात आले आणि त्यानंतर ‘कागद चुकला’ असे सांगून पुन्हा फोटो व सही घेण्यात आली. ही सही कुलमुखत्यार पत्रावर घेण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.















