उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाईचे भूमिपुत्र व पुणे येथील प्रख्यात उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा आध्यात्मिक गुरु तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते बेंगळुरू येथील आश्रमात भव्य सन्मान करण्यात आला. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा गौरव प्रदान करण्यात आला.
भारत सरकारच्या ‘टेल डॉट कॉम’ तसेच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘जल योद्धा सन्मान २०२५’ वितरण सोहळा बेंगळुरू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सविता चव्हाण मॅडम व श्रीकांत पाखरे यांनी विशेष सहकार्य केले.
देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात उद्योजक रसिक कुंकुळोळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ही बाब अंबाजोगाईसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
या कार्यक्रमाला पुणे येथील आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आयकर आयुक्त कैलास गायकवाड, ‘मानवलोक’चे कार्यवाह अनिकेत लोहिया तसेच टेल डॉट कॉमचे अमेय साठ्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
यावेळी श्री श्री रविशंकर यांनी रसिक कुंकुळोळ यांच्या उद्योग क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे तसेच समाजहितासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगत त्यांनी त्यांचा सन्मान करून गौरव केला.
बेंगळुरू येथे झालेल्या या सन्मानामुळे अंबाजोगाईच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून, शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रसिक कुंकुळोळ यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन तरुणांनी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
















