तरुण मुलगा, त्याची पत्नी दोन दिवस होते डिजिटल अरेस्टमध्ये : १२ लाख पाठविणार होते
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सायबर चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक करतात, असे आजवर दिसून आले आहे. मात्र, निगडी येथे याच्या उलट प्रकार पाहायला मिळाला. एका तरुणाला व त्याच्या पत्नीला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट करून ठेवले होते. या तरुणाने आपल्या ८१ वर्षांच्या वडिलांना ही बाब सांगितली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या मुलगा व सुनेची होणारी संभाव्य फसवणूक टाळली.
निगडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला रविवारी, १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्हॉट्सअॅप कॉलद्वारे एका व्यक्तीने संपर्क साधला. समोरील व्यक्तीने तो मुंबई पोलीस क्राईम ब्रॅन्चमधून बोलत असल्याचे सांगितले.
त्या तरुणाच्या नावावर एक पार्सल पकडण्यात आले असून त्यात पाच वेगवेगळे पासपोर्ट तसेच एमडी ड्रग्ज आढळल्याचे सांगितले. त्यामुळे तुम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असेही सांगण्यात आले.
त्यानंतर त्या तरुणाला व त्याच्या पत्नीला ‘सिग्नल’ हे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आणि त्याद्वारे व्हिडिओ कॉल सुरू करण्यात आला. अधिकारी सांगत नाही तोपर्यंत कॉलसमोरून जाऊ नये, अशी धमकी देण्यात आली.
काही वेळाने पोलीस गणवेशातील बनावट अधिकाऱ्याने चौकशी करून पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगितले. ही बाब कोणालाही सांगू नये, अशीही धमकी देत त्यांना डिजिटल अरेस्टमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
१९ एप्रिल रोजी सकाळी ११ पासून २० एप्रिल दुपारी अडीच वाजेपर्यंत ‘सिग्नल’ अॅपद्वारे व्हिडिओ कॉल करत त्या तरुणाकडून त्याच्या बँक खात्याची व आधारची माहिती घेण्यात आली. त्याला बँक खात्यातून पैसे पाठविण्यास सांगण्यात आले होते.
त्याने आपल्या म्युच्युअल फंडमधून १२ लाख रुपये काढण्याची विनंती केली होती. ही रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ती सायबर गुन्हेगारांना पाठविण्याचा त्याचा विचार होता. दरम्यान, या प्रकाराबाबत त्या तरुणाने मोबाईल दूर ठेवून आपल्या ८१ वर्षांच्या वडिलांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांच्याशी संपर्क साधून ही बाब कळवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस अंमलदार सोपान बोधवड, मुकुंद वारे आणि निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार स्नेहा म्हस्के यांनी त्या तरुणाच्या घरी भेट दिली. त्यांनी तरुण व त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांना सायबर फसवणुकीपासून वाचविले.
जनजागृतीमुळे नागरिक झाले सतर्क
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक व रहिवासी सोसायट्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे हा प्रकार ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आला. त्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आभार व्यक्त केले. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नाही. कोणताही पोलीस अधिकारी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून डिजिटल अरेस्ट करत नाही. आपल्याला कोणत्याही अधिकाऱ्याकडून चौकशीसाठी व्हिडिओ कॉल आल्यास त्याला प्रतिसाद न देता जवळच्या पोलीस ठाण्यात, पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
















