वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून घेतले पैसे : सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवरून कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाहतूक नियम मोडले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून चिरीमिरी घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार अंकुश रामा पवार आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत पोलीस नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे घेताना दिसून आले होते.
पोलीस हवालदार अंकुश रामा पवार, पोलीस अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे व मनोज पांडुरंग बदडे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओच्या अनुशंगाने जबाब नोंदविण्यात आला. सहकारनगर वाहतूक विभागातील हवालदार पवार व रामगडे यांना १९ एप्रिल २०२६ रोजी शारदा आर्केड चौकात वाहतूक नियमन कर्तव्यासाठी नेमण्यात आले होते.
शारदा आर्केड चौकात दुचाकी वाहनांनी सिग्नल तोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना रस्त्याच्या बाजूला उभे करण्यात आले. एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करत असताना दुसऱ्या वाहनचालकाने पवार व रामगडे यांचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.
त्यांनी १९ एप्रिल रोजी एकूण तीन दंडात्मक कारवाया केल्या असून एकही अबॉट चलन करण्यात आलेले नाही (कारवाई करताना तांत्रिक अडचण आल्याने प्रक्रिया पूर्ण झाली नाही). त्यातील एका दुचाकी वाहनचालकावर ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
चौकशीत त्यांच्याकडून १५० रुपये, दुसऱ्या वाहनचालकाकडून १५० रुपये आणि तिसऱ्या वाहनचालकाकडून २०० रुपये ऑनलाईन घेतल्याचे दिसून आले. कर्तव्य बजावत असताना बेशिस्त व बेजबाबदारपणे तसेच पोलीस खात्यास अशोभनीय असे गैरवर्तन केल्याने दोघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
















