डेक्कन पोलिसांनी एकाला अटक करून अल्पवयीन साथीदाराला घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डेक्कन येथील भिडे पुलाजवळील नदीपात्रात तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. आर्थिक वादातून हा खून करण्यात आल्याचे डेक्कन पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
ओंकार गणेश कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर कुशल अरुण कसबे (वय ३३, रा. धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. भिडे पुलाजवळ १९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता.
त्याच्या गळ्याजवळ वार करून त्याचा खून करण्यात आला होता. मृताच्या हातावरील टॅटू आणि पोलिसांकडील नोंदींवरून त्याचे नाव कुशल अरुण कसबे असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणातून ओंकार कांबळे व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने हा खून केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी कसबे याचे कुटुंबीय व निकटवर्तीयांची चौकशी केली. डेक्कन जिमखाना परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार कांबळेने त्याची दुचाकी हडपसर परिसरात लावल्याचे आढळले. मनीषा ब्लिस सोसायटी येथे ही दुचाकी सापडली. दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले.
पोलिसांनी डिक्की उघडली असता त्यात मोबाइल फोन सापडले. तो आणि त्याच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार कर्नाटकातील गदग येथे पसार होण्याच्या तयारीत असून, दोघेही हडपसर परिसरात थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी कांबळेसह अल्पवयीन साथीदाराला सापळा लावून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तसेच गुन्हे शाखेतील युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या पथकाने केली.
नोकरीचा बहाणा जीवावर बेतला
नोकरी लावण्यासाठी कुशल कसबे याने ओंकार कांबळे याच्याकडून ७० हजार रुपये घेतले होते. ओंकार कांबळे हा बेरोजगार आहे. पैसे दिल्यानंतरही कसबे याने नोकरी लावली नव्हती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून कुशल कसबे याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.















