वेदविहार सोसायटीचे चेअरमनसह कार्यकारिणी सदस्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोसायटीच्या आवारात बसविण्यासाठी आणलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिका नवनाथ देवीकर (वय साडेचार वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील नवनाथ पांडुरंग देवीकर (वय ३४, रा. वेदविहार सोसायटी, नोबल हॉस्पिटलजवळ, मगरपट्टा, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोसायटीतील अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मगरपट्टा येथील वेदविहार सोसायटीमध्ये ७ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिका सोसायटीच्या आवारात खेळत होती. सोसायटीकडून आवारात लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात येणार होती. त्यासाठी एक लोखंडी घसरगुंडी आणून उभी करून ठेवण्यात आली होती.
ही लोखंडी घसरगुंडी पडून अनिकाच्या डोक्याला, चेहऱ्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील अनिकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा १५ एप्रिल रोजी पहाटे मृत्यू झाला.
सोसायटीच्या आवारातील घसरगुंडी व्यवस्थित बसविण्यात आली नव्हती आणि ती रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली होती. ती काढून टाकण्याबाबत अनिकाचे वडील नवनाथ यांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत त्यांनी वारंवार तक्रारही दिली होती.
मात्र, सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे अनिकाचे वडील नवनाथ देवीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी सोसायटीच्या चेअरमनसह कार्यकारिणी सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साने तपास करत आहेत.















