बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले, 13 दुचाकी केल्या जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहर व सातारा शहरात दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या आहे. पोलिसांनी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले.
अख्तर चांद मुजावर (वय ४४, रा. मु.पो. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सैफन चांदसाब मुजावर (रा. बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नातेवाईक ऑगस्ट 2021 मध्ये ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असल्याने त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी हॉस्पिटलच्या आवारातून चोरीला गेली होती.
पोलिसांनी दुचाकी चोरतानाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी सातारा येथील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या. आरोपी ससून हॉस्पिटल परिसरातून 6, पुणे शहर, हडपसर, निगडी, स्वारगेट आणि सातारा शहरातून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे,
बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन काळे, पोलीस अंमलदार फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














