बिबवेवाडीतील एसआरएचा बनावट खरेदी खताद्वारे प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल आणि अमित गोयल यांच्या विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल व अमित गोयल यांनी बनावट खरेदी खताद्वारे बिबवेवाडीतील जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करून मूळ जागामालक, वारसदार आणि शासनाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल झाला आहे.
अतुल जयप्रकाश गोयल (वय 47, रा. पूना क्लब समोर) अमित जयप्रकाश गोयल (वय 40), मयत कैलास किसन तिकोणे (रा. कसबा पेठ), छगन फक्कडराव थोरवे (रा. तुळशी नगर, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राहुल कैलास तिकोणे(वय 50, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी राहुल तिकोणे यांच्या पत्नी संगीता तिकोणे या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राहुल तिकोणे यांची बिबवेवाडी येथे सर्वे नंबर 659/10, 659/12बी, 660/ 04 येथे जमीन आहे. या जमिनीवर सध्या झोपडपट्टी अस्तित्वात आहे. राहुल तिकोणे यांचे वडील कैलास किसनराव तिकोने यांनी आणि फक्कडराव थोरवे या दोघांनी अधिकार नसताना बिबवेवडीतील मिळकतीचे कुलमुखत्यारपत्र तयार केले. 2006 साली गोयल गंगा ग्रुपचे अमित गोयल यांना हे कुलमुखत्यार पत्र करून दिले. अमित व अतुल गोयल यांनी त्याआधारे खोटे खरेदीखत तयार केले. हे खरेदीखत खरे असल्याचे भासवित त्याआधारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रस्ताव दाखल केला. या झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यानंतर राहुल तिकोणे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती काढून पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे करीत आहेत.
















