गस्तीवरील पोलिसांची तत्परता ठरली महत्त्वाची : भारती विद्यापीठ पोलिसांनी केले मत परिवर्तन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक कलहातून राहत्या घरात ओढणीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पुणे पोलिसांनी प्राण वाचवले. ही घटना गुरुवारी रात्री पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांना तरुणाचे मत परिवर्तन करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच मिनिटात घटनास्थळी धाव घेत तरुणाचे प्राण वाचवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल ब्रह्मानंद केंद्रे व नानासो खाडे हे गुरुवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी केंद्रे यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा कॉल आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पस येथून मिळाला. घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता केंद्रे आणि खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी आपल्याच घरात एक तरुण खुर्चीवर उभे राहून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत होता.
ब्रह्मानंद केंद्रे यांनी तात्काळ या तरुणाला खाली घेऊन त्याला समजावून सांगत त्याचे मन परिवर्तन केले. आंबेगाव पठार मार्शल यांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. तसेच त्याचे आत्महत्या करण्यापासून मनही परिवर्तन केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी केंद्रे आणि खाडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
