हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांत भीतीचे वातावरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटवर्क
पुणे : हवेत पिस्टल रोखत दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत शिवीगाळ तिघांना जेरबंद केले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात ही घटना घडली.
शुभम रमेश कवडे, संजय राजेंद्र पवार, विशाल दादा शिंदे असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी मयूर मधुकर यादव (वय ३०, अॅस्ट्रिया ग्रॅन्ड सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी शुभम कवडे, संजय पवार, विशाल शिंदे यांनी बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२४) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवशंकर हाईट्स, ढमाळवाडी, भेकराईनगर परिसरात हवेत पिस्टल रोखून मला ओळखत नाही का, दुकान बंद कर, मी सांगितल्याशिवाय दुकान उघडायचे नाही, आधीच एकाला वर पोहोचवला आहे. त्यात आता तुझा नंबर लावून घेऊ नको, असे ओरडत दुकानदारांना शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण केली.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, राजू अडागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.














