महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारतातील सुशासन, डिजिटल इनोव्हेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना ‘स्कॉच’ पुरस्कार दिला जातो. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत नागरिकांच्या सहभागासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिक अॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.
शासन, पोलीस विभाग, सार्वजनिक संस्था, बँका, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे मूल्यांकन करून त्यांना ‘स्कॉच’ अवॉर्ड प्रदान केला जातो.
नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा पुरविणाऱ्या उपक्रमांसाठी हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार ‘स्कॉच’ ग्रुप या स्वतंत्र थिंक टँक संस्थेमार्फत दिला जातो. या पुरस्कारासाठी प्रकल्पांना काही पात्रता फेऱ्या पार कराव्या लागतात.
प्रथम प्रकल्पाची नोंदणी व प्राथमिक छाननी केली जाते. त्यानंतर निवडलेल्या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन व तज्ज्ञ समितीसमोर मूल्यांकन होते. पुढील टप्प्यात प्रकल्पाचे स्वतंत्र ज्युरीकडून मूल्यांकन केले जाते. या प्रक्रियेत प्रकल्पाचा नाविन्यपूर्णपणा, समाजावर होणारा सकारात्मक परिणाम, कार्यक्षम अंमलबजावणी, पारदर्शकता, टिकाऊपणा व सार्वजनिक हिताला होणारा फायदा या निकषांवर तपास केला जातो.
सर्व टप्प्यांमध्ये उच्च गुण मिळवणाऱ्या प्रकल्पांना अंतिमत: स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट किंवा स्कॉच अवॉर्ड प्रदान करण्यात येतो. पुणे वाहतूक पोलिसांचे पीटीपी ट्रॅफिक अॅप १४ जून २०२५ रोजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव आणि ओम्नी ब्रिज टेक्नॉलॉजीचे संचालक राजेंद्र काणे यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे.
या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अॅप सुरू झाल्यापासून ८ महिन्यांच्या कालावधीत १ लाख ४० हजारांहून अधिक नागरिक याचा वापर करत आहेत. या नागरिकांकडून २ लाखांपेक्षा जास्त नियमभंगाची माहिती पोलिसांना सादर करण्यात आली आहे. त्यावर १२ कोटींपेक्षा जास्त रकमेचा दंड नियमभंग करणाऱ्यांकडून आकारण्यात आला आहे.
शहर वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या पीटीपी ट्रॅफिक अॅपची स्कॉच पुरस्कारासाठी या अभिनव उपक्रमांतर्गत निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराची अधिकृत घोषणा ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. हा पुरस्कार २८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण व अंमलबजावणी प्रक्रियेत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलीस हवालदार शरद दौंड, टेक्निकल अॅडव्हायझर ओम्नी ब्रिज टेक्नॉलॉजीचे संचालक राजेंद्र काणे, इंजिनिअर नितीन वैद्य व क्रिश इंट्राट्रेड कंपनीचे सपोर्ट मॅनेजर अमित गोंजारी यांनी सहकार्य केले आहे.
अॅपच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न – या अॅपच्या माध्यमातून वाहतूक कोंडीस कारणीभूत असणाऱ्या १) अपघात, २) वाहनात बिघाड, ३) रस्त्यावरील खड्डे, ४) वाहतूक कोंडी, ५) रस्त्यात तेल गळती, ६) रस्त्यावर पाणी साचणे, ७) रस्त्यावर झाड पडणे, ८) रस्त्यात बेवारस असणारे वाहन इत्यादी अडथळ्यांची माहिती नागरिकांकडून अॅपद्वारे वाहतूक पोलिसांना कळविण्यात येते. आतापर्यंत ५ हजार ४०० पेक्षा जास्त घटनांचे रिपोर्ट नागरिकांकडून देण्यात आले असून त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक घटनांवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. २०२० मध्ये पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू केलेल्या सेवा अॅपला स्कॉच पुरस्कार मिळाला होता. या अॅपचा अजूनही नियमितपणे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपयोग केला जात आहे.















