पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे : येरवडा येथील वाहतूक कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी आल्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी येरवडा येथील वाहतूक शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात २६-११ रोजी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त श्रीमती गलांडे, वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
सह्याद्री हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे डॉ. स्मिता जोशी अनघा पळसकर व ब्लडकनेक्टचे प्रीती श्रीवास्तवा, यश सुरना यांच्या सहयोगाने शुक्रवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता वाहतूक शाखेकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठे योगदान दिले. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल यांनी आभार मानले.