लोणीकाळभोर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर रोडवर शिंदवणे रोडवरील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे स्टेशनहून उरुळी कांचनला जाण्यासाठी गाडी ठरवून प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी वाटेत चाकूचा धाक दाखवून कॅबचालकाला लुटून त्याची चारचाकी गाडी चोरुन नेली. हा प्रकार हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
याप्रकरणी सुनिल यशंवत शेडगे (वय ३५, रा. मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सुनिल शेडगे हे पुणे स्टेशन येथे भाडे घेण्यासाठी थांबले असताना दोघे जण त्यांच्याकडे आले. त्यांनी उरुळी कांचन येथे जाण्यासाठी भाडे ठरविले. त्यानुसार ते गाडीने जात असताना पुणे सोलापूर रोडवरील लोणकर वस्तीच्या पुढे आल्यावर गाडीतील दोघा प्रवाशांनी फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील १२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांना खाली उतरवून साडेचार लाख रुपयांची चारचाकी गाडी चोरुन नेली. सहायक पोलीस निरीक्षक महानोर तपास करीत आहेत.














