गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ची कारवाई : १७ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एम.डी. अंमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे स्टेशन परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ने जेरबंद केले. आरोपीकडून १७ लाख ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सलीम मुबारक शेख (वय ३७, रा. सहारा अपार्टमेंट, नवाजीश चौक, मिठानगर, कोंढवा, पुणे) आणि विजय विनोद डेडवालकर (वय ३३, रा. बरके आळी, सोमवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुकाराम शेठ शिंदे वाहनतळासमोर दोघे संशयित ॲक्टिवा गाडीवर दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, एकाकडे १०४ ग्रॅम ४५० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमलीपदार्थ १५ लाख ६७ हजार रुपये, एक ॲक्टिवा गाडी ५० हजार रुपये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपये, दोन हजार २०० रुपये आणि दुसऱ्याकडे १० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) एक लाख ५० हजार रुपये, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल पाच हजार रुपये असा एकूण १७ लाख ८५ हजार २०० रुपयांचा मिळून आला. दोन्ही आरोपींवर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, अंमली पदार्थविरोधी पथक-१चे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली.
