दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : अरण्येश्वर गवळीवाडा येथे घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुलाने जातीबाह्य विवाह केल्याच्या कारणावरुन समाजात सामील होण्यास बहिष्कार घालण्यास सांगणाऱ्या जातपंचायतीच्या 5 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा प्रकार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अरण्येश्वर गवळीवाडा येथील मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये घडला.
अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरीभाऊ हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळु औरंगे व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र समाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले (वय-69 रा.गवळीवाडा, खडकी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे नातेवाईक संजय नायकु यांच्या मुलाचा 27 नोव्हेंबर रोजी साखरपुडा होता. समाजाने आणि नायकु यांनी आमंत्रित केल्याने फिर्यादी मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमासाठी समाजाचे पंच असलेले आरोपी हे देखील आले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या मुलाने जातीबाहेरील मुलीशी लग्न केले आहे, त्यांना आमच्यात येणे बंद केले आहे. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमास का बोलावले? असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना समाजात सामील होण्यास बहिष्कार घालण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकाळजे तपास करीत आहेत.
