बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : पाच गुन्हे उघड, दोन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मागिल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या जबरी चोरी व दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या.
शाहुराज बाबासाहेब कोकरे (वय २२, रा. कोकरेवस्ती, घाटपिंप्री, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी मागिल सहा महिन्यांपासून गुंगारा देत होता. तपासादरम्यान तो कोकरेवस्ती, घाटापिंप्री (ता. आष्टी, जि. बीड) येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ४ तर मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये एक असे त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक काळुखे करीत आहेत.
