चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल : बनावट सही, शिक्क्याचा केला वापर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बीएमडब्ल्यु स्पोर्ट कार व मर्सिडीज जी एल ई ३०० या कार डिस्काऊंटमध्ये देतो, असे सांगून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कुणाल राजेंद्र जैन (वय ३१, रा. कुमार कॉर्नर, कॉन्व्हेट स्ट्रिट) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अर्जुन राज (रा. बेलापूर, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची सुपर सिलेक्ट नावाची कार खेरदी विक्रीचे शोरुम बाणेर येथे आहे. आरोपी अर्जुन राज याने फिर्यादी यांच्या कंपनीस बी एम डब्ल्यु ७४० एम स्पोर्ट कार व मर्सिडीज जी एल ई ३०० या कार डिस्काऊंटमध्ये देतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. बी एम डब्ल्यु इन्फेनिटी कार्स प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर १ कोटी ३३ लाख ५२ हजार ५०० रुपये व मर्सिडीज टी अँड टी मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या एच डी एफ सी बँकेच्या बादरपूर, नवी दिल्ली शाखेतील खात्यात ६५ लाख ४ हजार २७२ रुपये भरायला सांगितले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे किंग्ज कार केअर एलएल पी नावाची कंपनीची खोटी लेटरहेड तयार करुन त्यावर कंपनीचा बनावट सही शिक्का मारुन ते खरे असल्याचे भासविले. बीएमडब्ल्यु व मर्सिडीज शोरुममधून दोन्ही कार परस्पर घेऊन कार फिर्यादी यांना न देता. त्या परस्पर इतरांना विकून कंपनीची फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
