हडपसरच्या सातववाडी येथील घटना : आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली सुसाईड नोट
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नी आणि सासर्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगेश रुपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. योगेश यांच्या पत्नी आणि सासर्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुरेखा रुपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, योगेश धनवडे हा सध्या बेरोजगार होता. त्यावरुन पत्नी व सासरे हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. दोघांच्या त्रासाला कंटाळून योगेश याने सातववाडी येथील घरात १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने पत्नी व सासरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्याची ही चिठ्ठी नुकतीच सापडली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
