नऊ गुन्हे उघड : विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या एका बॉलपेनवरून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील तब्बल 29 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील लोहगाव येथील निरगुडी रोडवर करण्यात आली आहे.
गजराज मोतीलाल वर्मा (वय-38 रा. पानमळा, धायरी वडगाव,पुणे मुळ रा. कोटरी ता. आष्टा जि. सिव्होर, मध्य प्रदेश), गोरे उर्फ गणेश रती राणा (वय-22 रा. रिद्धी सिद्धी सोसायटी, पेडगाव पनवेल, नवी मुंबई, मुळ रा. कुंती, ता. बंडाली जि. मुगलशने, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक अंकुश जोगदंडे, शिवराज चव्हाण व विनोद महाजन यांना माहिती मिळाली की, लोहगाव येथील निरगुडी रोडवर संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गजराज वर्मा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीमध्ये घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना सापडले. तसेच एक सिल्व्हर रंगाचा कंपनीचा बॉलपेन आढळून आला. त्यावर इंग्रजीमध्ये अरविंद हिंगे असे लिहिलेले होते. आरोपीकडे सापडलेल्या पेनवरील नावाच्या व्यक्तीने ऑक्टोबरमध्ये घरफोडीचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.
तसेच आरोपीने त्याचे साथिदार गणेश राणा आणि शशिकांत भिमराव जाधव (वय-32 रा. बिटरगाव, पो. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या मदतीने लोहगाव, चंदननगर परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. पोलिसांनी विमानतळ पोलीस ठाण्यातील 8 आणि चंदननगर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आणून 29 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींवर पुणे शहरात यापुर्वी चोरी, घरफोडी अशा प्रकारचे 24 गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, सचिन जाधव, रमेश लोहकरे, उमेश धेंडे, रुपेश पिसाळ, हरुण पठाण, अंकुश जोगदंडे, विनोद महाजन, नाना कर्चे, शिवाराज चव्हाण, गिरीश नागेकर, किरण अब्दागिरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
