पोलिसांनी तिघांना केले अटक : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार !
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा चौकामध्ये गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, यामध्ये स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी फायर केले. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये येथे रविवारी (दि. 26) रात्री सव्वा अकराच्या सुमारास गावात घडली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले आहे.
गणेश हनुमंत मोटे (वय-23 रा. कवडेनगर, लाईन नं.3 सांगवी), महेश तुकाराम माने (वय-23 रा. कवडेनगर, सांगवी मुळ रा. पाटसांगवी, ता. भुम जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव चव्हाण (वय-21 रा. काटेपुरम चौक विनायकनगर नवी सांगवी मुळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, 18 डिसेंबर रोजी भरदिवसा योगेश रवींद्र जगताप (वय 36, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. सांगवी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने व पथकातील इतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान रविवारी रात्री आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये, कुरंकुडी ता. खेड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर तपास पथकातील अधिकारी यांचे चार पथकं कोये या ठिकाणी रवाना झाले. कोये गावात आरोपींचा शोध घेत असताना एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजुला आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर गाडी झाडीत दिसून आली. आरोपींचा परिसरात शोध घेत असताना आरोपींना पोलिसांची चाहूल लागली. आरोपीं ज्या घरात लपून बसले होते तेथून पळून जात असताना दोघांनी पोलीस पथकावर एक राउंड फायर केले. त्याचवेळी दुसऱ्या रोडने येणाऱ्या दुसऱ्या पथकावर आरोपींनी एक राउंड फायर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोनपे, सतिश कांबळे यांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. आरोपी झुडपात पळुन जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याठिकाणी पडलेले झाड आरोपींच्या अंगावर टाकले. आरोपी खाली पडताच पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक मोरे, गेंगजे, नरळे, चौधरी, मुळुक, पाटील, गायकवाड, सुर्यवंशी, बाबा, तेलेवार कदम यांच्या पथकाने केली.
