रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला असताना घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर येथील बंटर बर्नाड शाळेसमोरील रस्त्यावर डंपरने पादचाऱ्याला उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर सासवड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव झाला होता. तेथे वाहतुक कोंडी झाल्याने हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी डंपर बाजूला घेऊन वाहनांना रस्ता मोकळा केला.
दरम्यान, पादचारी रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला होता. पाठीमागून एका दुचाकीने त्याला धडक दिली. यानंतर डंपरने धडक देऊन तो डंपरच्या खाली अडकला. डंपरने त्याला 30 फूट फरफटत नेले. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
