अलंकार पोलिसांत गुन्हा : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वेनगरमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना रविवारी (दि.26) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल राजेंद्र जाधव (वय-20 रा. कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ने ताब्यात घेतले आहे.
रविवारी सायंकाळी अनिल जाधव याचा खुन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलीस आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना अनिल जाधव याचा खून अल्पवयीन मुलांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच ते दोघे कोथरूड येथील चांदणी चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या कारणामुळे केला खून…
ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांकडे चौकशी केली असता, मयत अनिल जाधव हा मावळे आळीतील त्याच्या घराजवळील रस्त्यावरुन येता-जाता शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तसेच तो सिगारेट आणि पेट्रोलसाठी जबरदस्तीने पैसे मागत होता. पैसे दिले नाही तर मारहाण करत होता. याशिवाय दोन महिन्यापूर्वी अनिल जाधव आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली होती. याच रागातून कर्वेनगर येथील बंगला क्रमांक 85 समोरील सार्वजनिक रस्त्यावर अनिलवर कोयता आणि तलवारीने वार करुन खून केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील तपासासाठी अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण व विजय कांबळे यांच्या पथकाने केली.
