सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : कोयता व दांडके हातात उंचावत केला आरडाओरडा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : इथल्या भाईविरुद्ध कोणी बोलले तर त्याला आम्ही मारून टाकू, असे म्हणत कोयते व दांडके हातात वर करत जोरजोरात ओरडणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रायगडनगर (वडगाव बुद्रुक) येथील वॉशिंग सेंटरजवळ रविवारी (दि. २६ डिसेंबर २०२१) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
गणेश चोरघे (वय २२, रा. वडगाव पठार, वडगाव, पुणे )यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार दोघांसह सात-आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्रासह वडगाव पठार येथून जाधवनगर येथे पायी जात होते. त्यावेळी दोघांसह सात-आठ जण हातात कोयते व दांडके घेऊन आले आणि शिवीगाळ केली. तुला लय माज आला आहे. मागच्या वेळी तुला सोडून दिले, नाही तर त्याचवेळी तुला मारून टाकले असते. आता तुला जिवंत सोडणार नाही, तुला मारून टाकतो, असे म्हणत कोयता डोक्यात मारल्याचे पाहून मित्र पळून गेला. त्याचवेळी इतर आरोपींनी खांद्यावर, डोक्यावर पाठीवर, बरगडीवर, पायावर जोरजोराने मारून जखमी केले, त्यानंतर कोयते व दांडके वर करून ओरडू लागले. इथल्या भाईच्या विरोधात बोलले तर आम्ही त्याला मारून टाकू असा आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे पुढील तपास करीत आहेत.
