गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल आणि जिवंत काडतुसे केली जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ने मुसक्या आवळल्या. आरोपीकडून ६२ हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले.
संतोष शंकर शिंदे ऊर्फ शेंडगे (वय २२, रा. गल्ली नं.४७, लुंकड शाळेजवळ, तळजाई वसाहत, पद्मावती, सहकारनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी पुणे रेल्वे स्टेशन गेट क्र.४ समोरील पेट्रोल पंपालगत एक इसम पिस्टल घेऊन उभा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपास करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६२ हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्याच्यावर दौंड पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, अनिकेत बाबर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, अशोक माने, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
