लेफ्टनंट कर्नलचा समावेश : राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहे. टीईटी, म्हाडा आणि आरोग्य भरती परीक्षेत गैरकारभार झाल्याचे समोर आल्यानंतर आता लष्करी भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटने चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयने केलेल्या या कारवाईमध्ये एका लेफ्टनंट कर्नलचा समावेश आहे.
लष्करी परीक्षेचा पेपर लिक केल्याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार (सर्व आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, सदर्न कमांड, पुणे) आणि अलोक यांच्या पत्नीला सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटनं बेड्या ठोकल्या आहेत.
2019 मध्ये सैन्याच्या पदांची भरती झाली होती. या परीक्षेची अॅन्सर की आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर आरोपींवर नजर ठेवण्यात आली. त्यांचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले. त्यात चौघांनी 40 ते 50 हजारांत उत्तर पत्रिका विकल्याचे आढळून आले. लेफ्टनंट कर्नल रायझादा आणि हवालदार नाहक हे पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत आहेत. तर अलोक कुमार रायझादाच्या ऑफिसमध्ये काम करतो. या चौघांचा 2021 मध्ये झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
