महिलेसह दोघे गोत्यात : वानवडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-महंमदवाडी येथील काळेपडळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीराम चौकात गुरुवारी (दि.30) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
ताजुद्दीन हबीब पठाण (वय-53 रा. एकता कॉलनी, प्रगती शाळेजवळ, काळेपडळ, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्दीक कासीम शेख (वय-31 रा. आंबेडकर नगर, देहुरोड) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (दि.31) फिर्याद दिली असून, त्यानुसार महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मयत ताजुद्दीन पठाण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या कामावर काम करणारी महिला आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. मयताचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा मागील आठ महिन्यांपासून वेगळे राहत होते. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आरोपी महिला आणि तिचे नातेवाईक यांनी मयत ताजुद्दीन यांना बेदम मारहाण केली. आरोपी महिलेने ताजुद्दीन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर तिचे नातेवाईक राज पाटील याने स्टंपने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ताजुद्दीन यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत.
