गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : पाऊण लाखाचे आठ मोबाईल केले जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करून पाऊण लाख रुपयांचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले. खराडी, चंदननगर येथे गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
मुकेश शिवलाल दिवाकर (वय २१, रा. यशवंतनगर, जुने साईबाबा मंदिरामागे, खराडी, पुणे, मूळ रा. मु.पो. जलालपूर जवाहरगंज, पो. तिलापूर, जि. कोसंबी, उत्तर प्रदेश) आणि दीपककुमार मोहन जयस्वाल (वय २३, रा. चंदननगर चौपाटी, पुणे, मूळ रा. मु.पो. परसोहिया, पो. माथाबाजार, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
शहरामध्ये मोबाईल चोरी करणारी टोळी चंदननगर, खराडी येथे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून दोन सॅमसंग, दोन रेडमी, दोन ओपो, दोन एमआय असे विविध कंपन्यांचे आठ मोबाईल ७६ हजार रुपयांचे हस्तगत करण्यात आले. आरोपींनी पुणे शहर, खराडी, चंदननगर, वडगावशेरी या भागातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, तृप्ती संजय छाजेड (वय २२, रा. नवरत्न सोसायटी, वडगावशेरी, पुणे ) यांनी वडगावशेरी येथून मोबाईल चोरीला गेल्याची चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपीकडून चंदननगर पोलीस स्टेशन-३, विश्रामबाग पोलीस स्टेशन-१ असे चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, महिला पोलीस अंमलदार मीना पिंजण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
