सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तब्बल चार दिवस ठेवले होते डांबून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी दिलेले हात उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने तरुणाला सिंहगड रोडवरुन अपहरण करुन चार दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार सिंहगड कॉलेज कॅम्पस येथील क्युबाना कॅफे येथून सिंहगड रोडवरील गोयलगंगा येथे 10 ते 14 जानेवारी दरम्यान घडला.
सनी सुनिल छजलाणी (वय ३१, रा. केशवनगर, मुंढवा) आणि सलमान /उमर समीर शेख (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच पक्या, अभिजित, मयुर, शादाब अशा इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल चव्हाण (वय ३१, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, राहुल चव्हाण व त्यांचा भाऊ गोविंद चव्हाण यांनी व्यवसायासाठी सनी छजलाणी याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत न केल्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. राहुल हा 10 जानेवारी रोजी क्युबाना कॅफे येथे असताना सनी इतरांना घेऊन तेथे आला. त्याने राहुल याला मारहाण करुन जबरदस्तीने त्याचे अपहरण करुन आपल्या घरी नेले. तेथे त्याला डांबून ठेवले. त्या ठिकाणी मारहाण करुन पैसे परत नाही केले तर तुला जिंवत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 14 जानेवारी रोजी सुटका केल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.
