वानवडी पोलिसांत फिर्याद : माजी नगरसेवक फारुख इनामदारसह मुलांवर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी डाटा गोळा करण्यासाठी लसीकरण झाले आहे का याची पहाणी करण्यासाठी इच्छुक मान्यवरांकडून सध्या शहरात सर्वत्र सर्व्हे करण्याचे काम जोरात सुरु आहे. अशाच सर्व्हेसाठी आलेल्या मुलींना विरोध केल्याच्या गैरसमजातून माजी नगरसेवक व त्याच्या साथीदारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी, रबरी पाईप प्लास्टिकच्या जारने बेदम मारहाण करुन जखमी केले.
याप्रकरणी मेलरॉय मार्टीन डिसुझा (वय ६०, रा. गंगा व्हिलेज सोसायटी, महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माजी नगरसेवक फारुक इनामदार, त्यांचा मुलगा सुफीयान इनामदार, शहरु, साहील, आयफास व इतर अनोळखी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादीच्या गंगा व्हिलेज सोसायटीसमोर शनिवारी दुपारी २ वाजता घडली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात इच्छुकांकडून आपापल्या प्रभागात सर्व्हे केला जात आहे. त्यात सर्व्हे करणारे तुमच्या घरात किती जण आहे. सर्वांचे लसीकरण झाले आहे का अशी विचारणा करुन त्यांचे नाव, मोबाईल नंबर नोंदवून घेत आहेत. या सर्व्हेला आलेल्या मुलींना फिर्यादी यांनी विरोध केल्याचा फारुक इनामदार यांचा गैरसमज झाला. फिर्यादी हे चर्चमधून घरी जात असताना फारुक इनामदार, त्यांचा मुलगा व इतरांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी रबरी पाईप व प्लास्टिकच्या जारने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांचा चष्मा व घड्याळाचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाडकर तपास करीत आहेत.
