उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : खडकवाडी येथील बांबू हॉटेलजवळ घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जगात तिसरे महायुद्ध पाण्याच्या समस्येवरुन होईल, असे सांगितले जात असते. मात्र, आता गावांगावांच्या बाहेर उभारलेल्या फॉर्म हाऊसला पाणी पुरविण्यावरुन व्यावसायिक स्पर्धा सुरु झाली आहे. त्यातून एका तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खडकवाडी येथील बांबु हॉटेलजवळ २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
जीवेश व्यंकटेश चौव्हान (वय २२, रा. स्प्लेडरकंट्री सोसायटी, मांडवी खुर्द, हवेली) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर विजय जाधव (रा. मांडवी खुर्द, हवेली) याच्यावर गुन्हा केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची आई राजू जाधव यांच्याकडे साफ सफाईचे काम करतात. राजू जाधव यांचा भाऊ आरोपीचे वडिल विजय यांचे पाण्याचे टँकर ज्या फार्म हाऊसला पाणी देण्याचे काम करायचे. त्यापैकी बऱ्याच फार्म हाऊस मालकांनी आरोपीचे वडील विजय जाधव यांचे पाण्याचे टँकर बंद करुन राजू जाधव यांचे पाण्याचे टँकर घेण्यास सुरुवात केली. त्या कारणावरुन चिडून जाऊन समीर जाधव याने जीवेश याला फोन करुन बांबु हॉटेलजवळ बोलावले. त्याला बिअर पिण्यास भाग पाडले. त्यानंतर लघु शंकेसाठी रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडीत नेले. तेथे समीर याने आपल्याकडील चाकू काढून फिर्यादीच्या छाती व पोटावर, हातावर, कोपऱ्यावर, पायाच्या गुडघ्यावर वार केले. तुमच्यामुळे आमचे नुकसान झाले असे म्हणून गंभीर जखमी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहाटे तपास करीत आहेत.
















