गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : बिबवेवाडी आणि धनकवडीत कारवाई करून शस्त्रसाठा जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडी आणि धनकवडी येथे कारवाई करीत दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली. आरोपींकडून पिस्टल, कोयता, तलवार अशा शस्त्रांचा मोठा-साठा जप्त केला आहे. बिबवेवाडी येथे कारवाई करुन एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे, तर धनकवडी येथे 4 कोयते, 1 चॉपर, 1 तलवार जप्त केली आहे.
बिबवेवाडीतील सावन सुभाष गवळी (वय-24 रा. बिबवेवाडी, ओटा नं.193, सुहाग मंगल कार्यालयासमोर, पुणे), तर धनकवडी येथील कारवाईत प्रशांत विलास महांगरे (वय-34 रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) याला अटक केली आहे. दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे 2021 मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे याचा बिबवेवाडी येथे खून झाला होता. या गुन्ह्यात सावन गवळी, आनंद कामठे याच्यासह 9 आरोपींना अटक केली होती. मयत सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याच्या अंत्ययात्रेसाठी अॅम्ब्युलन्सच्या मागे किमान 100 ते 125 दुचाकी वाहनावर बालाजीनगर ते कात्रज स्मशानभुमी दरम्यान रॅली काढून परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माधव वाघाटेच्या खूनातील मुख्य आरोपी सावन गवळी व इतर आरोपी दोन महिन्यापूर्वी जामीनावर सुटले होते. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना, माधव वाघाटे खून प्रकरणातील मुख्य आरोपी सावन गवळी हा त्याच्या घरा बाहेर उभा असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँन्टमध्ये कंबरेला खचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह आढळून आले. पोलिसांनी पिस्टल आणि 2 काडतुसे असा एकूण 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता माधव वाघाटेचा खून केल्याने त्याच्या मित्र परिवाराकडून जिवाला भिती असल्याने पिस्टल ठेवल्याचे सांगितले. त्याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१ने धनकवडी येथे कारवाई करुन प्रशांत महांगरे याला अटक केली. पोलिसांना महांगरे याने तलवार, कोयते, चॉपर असे घातक शस्त्रांचा साठा केला असून ही शस्त्रे त्याने ज्ञानेश्वरी हौसींग सोसायटी मधील एस.आर बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील 106 नंबरच्या खोलीत ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारुन 1 चॉपर, 4 कोयते, 1 तलवार असा एकूण 3600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
