दोन मुले गंभीर जखमी : पिंपरी-चिंचवडजवळील दिघीमध्ये घडली दुर्दैवी घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड जवळील दिघी परिसरात रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्याने सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुंटूंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलगी आणि तिचे मित्र सकाळी अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी त्यांना शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब सापडला. त्यांनी हा बॉम्ब दगडाने ठेचल्याने स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखी 2 मुले जखमी झाली आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच दिघी पोलिस आणि आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी आणखी काही बॉम्ब आढळून आले आहेत. हे बॉम्ब पोलिसांनी जप्त केले असून, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.














