सोमवारी पहाटे घडली घटना : येरवडा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली.
समाधान कांतीलाल सावंत (वय-26 रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशनकडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या वेळेसाठी कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवले होते. सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या सहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले. मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालायात शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.
