वानवडी पोलिसांत गुन्हा : सोडचिठ्ठीसाठी १५ लाख रुपयांची करीत होती मागणी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सैन्य दलाच्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत असलेल्या जवानाने पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी केशव नानाभाऊ पाटील (शेलार) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बंधू गोरख शेलार हे भारतीय सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी त्याचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत खटके उडू लागले. पत्नी वारंवार मानसिक त्रास देत. तसेच त्यांना नोकरी घालविण्याची धमकी देत होती. गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्याची धमकी देऊन तुझ्यासह आणि तुझ्या परिवारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी पत्नीने शेलार यांना वारंवार दिली होती. तसेच पत्नीला सोडचिठ्ठी देण्यासाठी व १५ लाख रुपये देण्याची मागणी करीत शेलार यांना छळण्यात आले. याच जाचाला कंटाळून शेलार यांनी आत्महत्या केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल मोहिते करीत आहेत
