विमानतळ पोलिसांची कारवाई : एक लाखाचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक करुन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील लोहगाव येथे करण्यात आली.
आकाश हरिश्चंद्र पायगुडे (वय-21 रा. शिवमंदीराजवळ कलवडवस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून वाहन चोरांचा शोध घेत असताना सर्व्हिलन्स पोलीस अंमलदार उमेश धेंडे यांना एक सराईत वाहन चोर लोहगाव येथील कलवडवस्तीमध्ये सीडी डिलक्स चोरीच्या गाडीवर फिरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लोहगाव येथील कलवडवस्ती येथे शोध घेऊन आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीवर यापूर्वी दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून सी. डी. डिलक्स आणि व्हेस्पा मोपेड या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, उमेश धेंडे, सचिन जाधव, प्रदीप मोटे, गिरीष नाणेकर, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.
