विमानतळ पोलिसांची कारवाई : नगर रोडवरील मंत्री आयटी पार्क जवळ घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सरबत पिण्यासाठी थांबलेल्या एका व्यावसायिकावर हल्ला करुन त्याच्याकडील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पुण्यातील नगर रोडवरील मंत्री आयटी पार्कच्या गेटजवळ असलेल्या दुकानासमोर घडली.
महादेव सुभाष साठे (वय २१), सोमनाथ संजय कांबळे (वय १९), अनुराग भुजंग ससाणे (वय १९, तिघे रा. यमुनानगर, विमाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धांत चंपालाल चोरडिया (वय-30 रा. कळसगाव, आळंदी रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी सिंद्धात हे सरबत पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची लॅपटॉपची बॅग जबरदस्तीने घेतली. तसेच बॅग परत करण्यासाठी अडीच हजार रुपये मागून फिर्यादी यांना लोखंडी कोयता, फायटर, रॉड, पाण्याचा कॅन आणि वायरने बेदम मारहाण केली. तसेच खिशातील 2500 रुपये व लॅपटॉप घेऊन पळून गेले होते. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव आणि प्रदिप मोटे यांना गुन्ह्यातील आरोपी फोर पॉईंट हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादी यांची चोरलेली रोख रक्कम आणि मारहाण करण्यासाठी वापरलेला लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, फायटर जप्त केले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव, पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, रमेश लोहकरे, उमेश धेंडे, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, विनोद महाजन, नाना कर्चे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
